महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निवडक भाषणांचा हा पहिला अधिकृत संग्रह आहे. या संग्रहांत महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या काळांतील त्यांच्या भाषणांचा मुख्यतः समावेश केलेला असला तरी द्विभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी केलेल्या कांहीं भाषणांचाहि त्यांत अन्तर्भाव करण्यांत आला आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पांच वर्षांच्या काळांत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधीं त्यांनी जे विचार प्रदर्शित केले ते वाचकांना एकत्रित वाचावयास मिळावेत या दृष्टीनेंच या संग्रहांतील भाषणांची निवड करण्यांत आली आहे. पांच वर्षांचा काल हा राष्ट्राच्या, समाजाच्या किंवा व्यक्तीच्या जीवनातील फार मोठा कालखंड आहे असें नाहीं. परंतु इतिहासाची गति कालाच्या गतीनें नियंत्रित होत नसते. वर्षानुवर्षे संथपणानें चालणारा इतिहासाचा प्रवाह क्षणार्धात अशा कांही वेगानें उफाळून वाहूं लागतो कीं त्यामुळें व्यक्तींचे, समाजाचें आणि राष्ट्राचें जीवन आमूलाग्र बदलून जातें. गेल्या पांच वर्षांच्या काळांत महाराष्ट्राच्या जीवनांत असेच विलक्षण क्रांतिकारक बदल घडून आले आहेत. अनेक दृष्टींनीं महाराष्ट्राच्या इतिहासांतील हा अनन्यसाधारण असा काळ आहे. या ऐतिहासिक काळांत श्री. यशवंतरावांनीं प्रदर्शित केलेल्या महत्त्वाच्या विचारांचें प्रतिबिंब या संग्रहांत शक्य तों दिसावें असा प्रयत्न करण्यांत आला आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.