प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या 'होरपळ' या आत्मकथनाचा 'सूळकाटा' म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात. या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर... हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं. सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा... सूळकाटा !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.