सुनिता देशपांडे यांनी आंतरिक ऊर्मीने लिहिलेल्या ललित लेखांतले पंधरा निवडक लेख 'सोयरे सकळ'मध्ये समाविष्ट आहेत. संगीत, साहित्य, कला आदी क्षेत्रांतल्या प्रतिभावान, नामवंत व्यक्तींचा लोभ, स्नेह, सहवास, पु. ल. देशपांडे यांच्यामुळे आणि स्वत:च्या संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे सुनीताबाईंनी लाभला. समृद्ध जीवनानुभवात त्या वावरत आल्या. त्यांतल्या काहींची व्यक्तिचित्रे या संग्रहात अंतर्भूत आहेत. भारतीय संगीतातले तीन दिग्गज मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, मातबर कथाकार जी. ए. कुलकर्णी, समीक्षक माधव आचवल, भाषाशास्त्रज्ञ डॉ. ना. गो, कालेलकर आदींची अविस्मरणीय चित्रणे इथे आढळतील. व्यक्तिचित्रणांत सुनीताबाईंना विशेष स्वारस्य दिसत असले तरी जीवनातल्या विविध अनुभवांचे मनोज्ञ दर्शन त्यांच्या अन्य लेखांतून घडते. लौकिक अनुभवातून चराचरातल्या चैतन्याच्या, अंतर्मुख करणा-या, सर्वस्पर्शी अनुभवाकडे त्या 'सोयरे सकळ', 'चक्र', 'साखळी' अशा लेखांतून येताना दिसतात. 'एखादया गोष्टीतल्या रूपगुणांपेक्षा तिच्या गाभ्याला, अर्काला, मर्माला' महत्त्व देणा-या सुनीताबाई आपल्या शब्दकळेने वाचकाला खिळवून ठेवतात. निर्भयता, परखडपणा या त्यांच्या विशेषांसमवेत, त्यांच्या मनाची कोवळीक त्यांच्या लेखनातून स्पर्श करत राहते. हे लेखन वाचत असताना, मन भरून येऊन, क्षणभर थांबून पुढे जावे असा अनुभव येतो. अनुभव तीव्रपणे घेण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शब्दांतून उत्कटपणे रूपातन्तरित होत भेटते. गुणसंपन्न, मोलाच्या अशा या लेखनाचा दुर्मिळ आनंद 'सोयरे सकळ' वाचत असताना वाचकांना खचितच लाभले.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.